बालेवाडी : बालेवाडी येथे ममता चौकाजवळ मद्य विक्री दुकान आहे. येथून मद्यपी मद्य विकत घेऊन समोरच मेट्रो साठी लावलेल्या पत्र्याजवळ उघड्यावर मद्य प्राशन करतात. रिकाम्या बाटल्या तेथेच टाकतात. तेथेच उघड्यावर लघुशंका करतात. मद्यपी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क करतात. हा रहदारीचा रस्ता आहे. जवळच एसकेपी शैक्षणिक परिसर, रविंद्रनाथ टागोर शाळा व भारती विद्यापीठ शाळा आहेत. दिवसभर विद्यार्थी, पालक, महिला, जेष्ठ नागरिक व इतरांना येथून जावे जागते. हा मुख्यतः रहिवासी भाग असल्याने जवळच्या सोसायटीतील रहिवाशांना याचा फारच त्रास होतो. विशेषतः महिलांची कुचंबणा होते.
बाणेर पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार वेळोवेळी केली जाते. पोलिस कारवाई करतात. परंतु पोलिस गेल्यावर मद्यपी सर्व प्रकार पुन्हा सुरू करतात.याविषयी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि श्री खंडेराव प्रतिष्ठान बालेवाडी यांच्या तर्फे एक निवेदन अतुल कानडे साहेब, अधीक्षक, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले. अधीक्षकांनी आश्वासन दिले गेले की यात लक्ष घालून उचित कार्यवाही करण्यात येईल.
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे रमेश रोकडे, मोरेश्वर बालवडकर, वैभव आढाव, दफेदार सिंह, आशिष कोटमकर, ॲड. रुपाली रायकर व सुनिल गाळणकर यांनी निवेदन दिले आहे. नागरिकांचा त्रास कमी नाही झाला तर कायदेशीर कारवाई व आंदोलन करण्यात येईल असे श्री खंडेराय प्रतिष्ठान व बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने ठरविले आहे.
























