कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा एकनाथ शिंदेंचा पहिलाच पक्ष – खा. सुप्रियाताई सुळे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज सर्व प्रमुख वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. कमी मार्काने पास झालो हे कबूल करणारा हा पहिला पक्ष आहे, अशा शब्दात सुप्रियाताईंनी जाहिरातीची खिल्ली उडवली.

जाहिरातीद्वारे महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले असल्याचे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. मविआच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आणि सत्तेत असलेल्या सरकारचे अपयश वर्तमानपत्रातील जाहीरातबाजीवरून दिसतेय, असे त्या म्हणाल्या. २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे रयतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहनही सुप्रियाताईंनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना केले आहे.

शिवसेनेकडून बहुतांश वृत्तपत्रांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली.

See also  आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तृतीयपंथीयांचे आंदोलन; पोलिसांची कारवाई