३० वर्षांची निष्ठा, चार वेळा डावलणूक; तरीही संघविचाराशी निष्ठावंत राहून विशाल गांधिले यांचा उमेदवारी अर्ज माघारी

पुणे : गेल्या तब्बल ३० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असलेले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल गांधिले यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेर माघारी घेतला आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यानंतरही संघ आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेत त्यांनी ही भूमिका घेतली.
विशाल गांधिले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या परिसरात भाजपाची पहिली शाखा स्थापन करून पक्षाचे अस्तित्व निर्माण केले. त्या काळात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही स्वतःच्या गरजा, सुखसोयी आणि भवितव्य बाजूला ठेवून त्यांनी पक्षबांधणीसाठी एकहाती संघर्ष केला. उमेदीच्या वयात घर, कुटुंब आणि संसाराकडे दुर्लक्ष करून त्यांनी जवळपास तीन दशके अहोरात्र भाजपासाठी काम केले.

आंदोलनं, संघर्ष, उपेक्षा आणि अपमान सहन करत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, तरीही पक्षावरील निष्ठा आणि विश्वास कधीच डगमगला नाही. मात्र, इतक्या दीर्घ आणि निष्ठावान सेवेनंतरही २००७, २०१२, २०१७ आणि आता २०२६ अशा सलग चार महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आले.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले विशाल गांधिले यांनी अन्याय सहन करूनही संघविचारधारेच्या विरोधात जाण्याचा विचार कधीच केला नाही. भाजपकडून भरलेला अर्ज उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रूपांतरित होणार असतानाही, संघशिस्त आणि पक्षनिष्ठा जपत त्यांनी तो अर्ज माघारी घेतला.

“पद किंवा सत्ता माझ्यासाठी महत्त्वाची नाही. संघ, पक्ष आणि विचारधारा माझ्यासाठी सर्वांत वरची आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आपल्या पोस्टद्वारे मांडली आहे.विशाल गांधिले यांच्या या निर्णयामुळे भाजपातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून, संघनिष्ठेचा आदर्श त्यांनी पुन्हा अधोरेखित केला आहे.

See also  लोकनेते, दिवंगत खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त निवारा वृद्धाश्रमात शिधावाटप,हेमंत रासने यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम