कोथरूड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकाची ओळख जपत, कोथरूड प्रभाग क्रमांक ११ (ड) गटातून जयदीप पडवळ यांनी ‘शिट्टी’ या निशाणीवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रणांगणात उडी घेतली आहे. नाते जनसेवेचे कायम राखत परिसराच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.
देशातील सर्वात मोठा पक्ष केंद्र व राज्यात सत्तेवर असतानाही या प्रभागातील स्थानिक हितसंबंधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असताना, एकतर्फी वाटणाऱ्या लढतीत जयदीप पडवळ यांची ‘शिट्टी’ वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि स्वच्छ पर्याय उभा राहिल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील रामबाग कॉलनी परिसरातील उच्चभ्रू नागरिकांसह मुळशी तालुक्यातील बांधवांकडूनही जयदीप पडवळ यांच्या या अपक्ष भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे.
जयभवानीनगर, किष्कींधानगर, सुतारदरा, एआरआय टेकडी, राऊतवाडी, हनुमाननगर, केळेवाडी, रामबाग कॉलनी, एम.आय.टी. कॉलेज रोड, लिला पार्क–सुनिता पार्क, पेठकर साम्राज्य, म्हातोबानगर, स्नेह पॅराडाईज, जीवनछाया सोसायटी, एल.आय.सी. कॉलनी आदी भागांमधून जनसमुदाय मोठ्या प्रमाणात एकवटू लागला आहे.
गेल्या २६ वर्षांपासून कोथरूड परिसरात विविध समाजघटकांतील नागरिकांसाठी सामाजिक, लोकोपयोगी उपक्रम राबवत जयदीप पडवळ यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नागरिकांना दिलेले सहकार्य आणि मदत आज त्यांच्या प्रचारात मोठे भांडवल ठरत आहे.
‘उतु नका, मातु नका, घेतला वसा टाकू नका’ या तत्वाने नम्रता, आपुलकी आणि प्रेम जपत अन्यायाविरोधात तुटून पडणारा कार्यकर्ता म्हणून नागरिकांनी जयदीप पडवळ यांना नेहमीच पाहिले आहे. या २६ वर्षांच्या कामाच्या भरोशावर घरोघरी जाऊन मत मागण्याचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.
“वचन सामाजिक बांधिलकीचे… राजकारणाच्या पलीकडचे” या भूमिकेतून सुरू झालेला हा प्रचार सध्या कोथरूडमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, येत्या काळात प्रभाग ११ (ड) मधील निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
























