पुणे | प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना प्रभाग क्रमांक ९ मध्ये लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना उद्देशून प्रश्न विचारणारे हे बॅनर्स सध्या संपूर्ण पुण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.
“हाच का दादांचा वादा???” असा थेट सवाल करत,
प्रभाग क्र. ९ मध्ये
– पैसे वाटणाऱ्यांच्या प्रचारासाठी दादा येणार का?
– जमिनी लाटणाऱ्यांच्या समर्थनासाठी दादा उभे राहणार का?
– अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रचार दादा करणार का?
असे एकामागोमाग एक तीव्र प्रश्न या बॅनर्सद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत.
या बॅनर्सवर पुढे,“दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती…
तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे, पण प्रचंड नाराज असणारे प्रभाग क्र. ९ मधील सर्व मतदार” असा भावनिक उल्लेख करण्यात आला असून, यामुळे नाराजीचा सूर अधिक ठळकपणे समोर येत आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रभाग क्र. ९ मध्येच जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या बॅनर्सवरील आरोपांना आणि थेट विचारलेल्या प्रश्नांना अजितदादा काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थेट अजितदादांनाच लक्ष्य केल्यामुळे या बॅनर्सची चर्चा केवळ प्रभागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण पुणे शहरात रंगली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा किती प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
























