पुणे : खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांनी प्राण गमावले. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती प्रगती संतोष जगदाळे व कन्या कु. असावरी जगदाळे असा परिवार आहे. या घटनेनंतर राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडून कुटुंबाला मदतीचे आश्वासन देण्यात आले होते.
डॉ. कुलकर्णी यांनी पत्रात नमूद केले आहे की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांनी कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कन्या कु. असावरी जगदाळे यांना सहानुभूतीच्या तत्वावर शासकीय नोकरी देण्याचे सांगण्यात आले होते.
कु. असावरी जगदाळे यांनी भारती विद्यापीठ येथून मानव संसाधन व्यवस्थापन (HR) मध्ये MBA पूर्ण केले असून एच. व्ही. देसाई महाविद्यालय येथून संगणक विज्ञान विषयात B.Sc. पदवी संपादन केली आहे. सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-२ अधिकारी पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, नऊ महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित प्राधिकरणांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने कुटुंब आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहे.
डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कु. असावरी जगदाळे यांना त्यांच्या पात्रतेनुसार राज्य शासनात किंवा पुणे महानगरपालिका सेवेत योग्य पदावर नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती केली आहे. दहशतवादाच्या बळींप्रती शासनाने संवेदनशीलता दाखवून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
























