खड्डे, कचरा, पाणी आणि कराच्या प्रश्नांवर सुप्रिया सुळे यांची आयुक्तांसोबत बैठक

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत समाविष्ट असलेल्या भागांसह पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

शहरातील खड्डे, फुरसुंगी येथील कचरा डेपोची समस्या, कचरा व्यवस्थापन, महापालिकेत समाविष्ट गावांवर लावण्यात आलेला कर, उंड्री परिसरातील वाढते प्रदूषण आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यासह विविध विषय बैठकीत मांडण्यात आले.

तसेच बावधन येथील केतकी ओढ्यावर बांधण्यात आलेला रस्ता, शहरातील विविध भागांमध्ये नैसर्गिक प्रवाहांवर झालेले अतिक्रमण, डीएसके विश्व परिसरातील अपुरा वीजपुरवठा आणि खडकवासला भागात सुरू असलेली विकासकामे यावरही चर्चा करण्यात आली. खडकवासला परिसरात नव्याने आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत तसेच नागरिकांच्या विविध स्थानिक समस्यांबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या सर्व प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

बैठकीस आमदार बापूसाहेब पठारे, माजी खासदार वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, गटनेते सोपान (काका) चव्हाण, नगरसेविका अनिताताई इंगळे, नगरसेवक हाजी गफूर पठाण, माजी नगरसेवक विशाल तांबे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी यांच्यासह सविता दगडे, स्वाती पोकळे, भारती शेवाळे, आनंद मते, युवराज बेलदरे, दीपक बेलदरे, किशोर कांबळे, मनाली भिलारे, अतुल दांगट, सचिन दोडके, हनुमंत शिवूर तसेच नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

See also  कोरिया-भारत संबंधासाठी पीसीयूचा कोसमे पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण - कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू