अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनपा भवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून मराठा समाजासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या “पुढचं पाऊल” या पुस्तिकेचे मुखपृष्ठ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम देऊन सर्व स्वराज्य रथांच्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष युवराज दिसले, राकेश गायकवाड, गणेश मापारी, श्रुतिका पाडळे, रणजित बहिरट, मिलन पवार, सचिन वडघुले, अमर पवार, धनकवडे पाटील, अतिष शेडगे आणि सिद्धार्थ जाधव यांनी केले.

यावेळी तब्बल ९५ स्वराज्य रथ सहभागी झाले होते. स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रमी सरदार, सेनापती आणि स्वराज्यनिष्ठ वीरांच्या नावांनी सजविण्यात आलेल्या रथांमध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार प्रतापराव गुजर, बहिर्जी नाईक, वीर बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर यांसह अनेक स्वराज्यवीरांचा गौरव करण्यात आला.

उत्सवाला कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि शिवमय वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला. आयोजकांनी हा उपक्रम स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

See also  कोथरूड मिसिंग लिंक बाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आयुक्तांकडून आढावा