महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार – नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार 65 वी कुस्ती स्पर्धा

धाराशिव -65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार असुन नोव्हेंबर महिन्यामध्ये या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. लाल माती व मॅट या 2 गटात या स्पर्धा होणार असुन आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकारी यांनी पाहणी केली व त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाणार आहे. मानाची चांदीची गदा, सकार्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, उपाध्यक्ष दयानंद भक्त, तांत्रिक सचिव बंकट यादव, अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त विजेते काकासाहेब पवार, हातलाई कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील, भारतीय खो खो महासंघाचे सचिव चंद्रजीत जाधव, अभिराम व आदित्य सुधीर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

धाराशिव व लातूर जिल्हाधिकारी एकत्र असताना 25 नोव्हेंबर 1969 साली लातूर शहरात डालडा मैदान येथे या स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळी पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांना मानाची चांदीची गदा मिळाली होती ते महाराष्ट्र केसरी ठरले होते. यावर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद हे धाराशिव जिल्ह्याला मिळाले आहे. महाराष्ट्रातील कुस्ती खेळाडूंना यात संधी मिळणार असुन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

लाल माती व गादी अश्या 20 विविध वजनाच्या गटात ही स्पर्धा होणार आहे, 45 संघ असुन 900 खेळाडू, 150 पंच तांत्रिक अधिकारी सहभागी असणार आहेत.50 हजार ते 1 लाख प्रेक्षक रोज हजर राहणार आहेत. कुस्ती खेळाडू व कुस्ती प्रेमीसाठी हा एक प्रकारचा कुंभ मेळावा असतो या स्पर्धेकचे देशात आकर्षण असते. धाराशिव शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धा होणार आहेत.

धाराशिव जिल्हा तालीम संघ, सुधीर अण्णा पाटील मित्र परिवार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, हातलाई कुस्ती संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे.

See also  बालेवाडी येथे संविधान चषक स्पर्धेचे आयोजन