धानोरीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात; विद्यार्थ्यांचा विज्ञानप्रेमी सहभाग कौतुकास्पद – अध्यक्ष अशोक पाटील

धानोरी, पुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, धानोरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेत विज्ञान प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व विज्ञानदिनाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन करण्यात आली. विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

वादविवाद स्पर्धेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी साक्षी मस्के व श्रेया बोराडे यांनी प्रभावी मांडणी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत गौरी मस्के हिने प्रथम, सानवी कांबळे हिने द्वितीय तर श्रुती भोसले हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धकांनी विज्ञानाशी संबंधित विविध प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देत आपले ज्ञान सिद्ध केले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष श्री. अनुराग पाटील, संस्थापिका व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षक मनीषा चिंचणे, अंबादास कांबळे, मारुती पाटील, अनामिका कुलकर्णी, शुभांगी काळगुडे, सविता इमडे, अर्चना बनछोड, उर्मिला माळी, तृप्ती कांबळे, सुखदा वाळंज, रुपाली पवार, प्रिया शेलार, मानसी पलांडे, रमा डंबारे, गौतम बोरकडे आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अध्यक्ष अशोक पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ विषय म्हणून न पाहता जिज्ञासू वृत्तीने त्याचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि संशोधनाची आवड हीच भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळेचे व संस्थेचे अभिनंदन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड अधिक वृद्धिंगत झाली असल्याचे चित्र दिसून आले.

See also  प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांचा ‘नेक्स्टजेन रिसर्चर अवॉर्ड -२०२५’ ने व्हिएतनाममध्ये गौरव!