डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सतर्क; खाजगी रुग्णालयांना आयुक्तांचे तातडीने उपचार आणि IHIP पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश

पुणे : पुणे शहरात उद्भवलेल्या डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिका आयुक्तांच्या दालनात खाजगी वैद्यकीय रुग्णालयांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.), आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख निर्देश:
तातडीने उपचार आणि IHIP पोर्टलवर नोंद : डेंग्यूच्या रुग्णांना वेळेवर व तातडीने रुग्णालयात दाखल करून आवश्यक उपचार त्वरित सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच डेंग्यूबरोबरच इतर आजारांशी संबंधित रुग्णांची माहिती निदानानंतर त्वरित IHIP पोर्टलवर नोंदविण्याच्या सूचना खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्या.

रुग्णांमध्ये जनजागृती : डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी केवळ बाह्यरुग्ण विभागातच नव्हे, तर आंतररुग्ण विभागातही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती द्यावी, यावर आयुक्तांनी भर दिला. ताप आल्यामुळे उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनीही त्यानंतर प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये पुढील टप्प्यात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याची शक्यता असल्याने, रुग्णांना आवश्यक खबरदारी व वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत मार्गदर्शन करावे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करणे, घरात व घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी व साठवण पात्रे नियमित स्वच्छ ठेवणे तसेच डासांची उत्पत्ती होणारी संभाव्य ठिकाणे नष्ट करणे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती रुग्णांना द्यावी. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी योग्य संवाद साधून त्यांना आजार, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्याबाबत संबंधित विभागांना सूचित करण्यात आले.

शहरी गरीब योजनेचा लाभ : डेंग्यू किंवा अन्य आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेची सविस्तर माहिती द्यावी व या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीदरम्यान खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या मांडल्या. या अडचणींची दखल घेऊन संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात येतील व त्यावर लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आयुक्तांनी आश्वस्त केले.

See also  औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

पुणे महानगरपालिकेमार्फत डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूरफवारणी, औषधफवारणी तसेच विविध माध्यमांतून जनजागृती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराबाबत घाबरून न जाता स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ताप किंवा डेंग्यूची लक्षणे आढळल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा व डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

डेंग्यूमुक्त पुण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून पुणे महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.