पुणे : बालेवाडी येथील एजंट जॅक या बारमध्ये मारहाण झाल्याचे सांगून बारमध्ये तसेच पोलीस ठाण्यात दारुच्या नशेत तरुण तरुणीने गोंधळ घातला. महिला पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या सरकारी गणवेशाला हात घालून हाताला चावा घेतला. रुग्णालयात तपासणीला जाताना तरुणीने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन “मी सुसाईड करुन तुमची नावे लिहून ठेवणार” अशी धमकी देऊन पोलिसांना धक्काबुक्की केली. बाणेर पोलिसांनी दारुच्या नशेत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मानसी चंपलाल परिहार्या (वय २४, रा. जरवरी सोसायटी, पिंपळे सौदागर) आणि युवराज निलेश परतानी (वय २४, रा. डीएसके विद्यानगरी, पाषाण सुस रोड, पाषाण) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षकांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बालेवाडी येथील एजंट जॅक बार आणि बाणेर पोलीस ठाण्यात ३मार्च रोजी रात्री पावणेबारा ते ४ मार्च पहाटे साडेपाच वाजेपर्यंत सुरु होता.
ADV
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी परिहार्या ही विद्यार्थीनी आहे. युवराज परतानी हा मुळचा हरियाना येथील राहणारा असून पुण्यात नोकरी करतो. हे दोघे एजंट जॅक येथे ३ मार्च रोजी रात्री पार्टीसाठी गेले होते. त्यांनी दारु पिल्यानंतर दोघांना कोणीतरी मारहाण केली. त्यावरुन त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी भांडणाचा प्रकार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मार्शल तसेच बाणेर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक एजंट जॅक्समध्ये पोहचले. त्यावेळी मानसी व तिचा मित्र युवराज परतानी हे गोंधळ घालत असल्याचे दिसले.
महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी विचारल्यावर मानसी हिने आम्हाला मारहाण झाली असून त्या करीता मला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आताच पाहायचे आहे, असे ती म्हणत होती. हॉटेल मॅनेजर यांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीचे कंट्रोल मुंबई येथे आहे, उद्या सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन तुम्हाला देण्यात येईल, असे सांगितले. तरीही दारुच्या अंमलाखाली असल्याने मानसी व युवराज हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़. त्यांना बाणेर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली. मी कोण आहे, तुम्हाला दाखवुन देते, अशी धमकी दिली.
या घटनेनंतर पोलीस त्या दोघांना घेऊन बाणेर पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना सरकारी हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचार करण्याबाबत सांगून वैद्यकीय यादी दिली होती. तरीही दोघांनी बाणेर पोलीस ठाण्यात विनाकारण गोंधळ घातला. यावेळी दोघांच्या तोंडाला आंबट व उग्र दारु पिल्याचा वास येत होता त्यांना उपचारासाठी जाण्यास सांगितल्यावर त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा गणवेश ओढून महिला पोलीस अंमलदार यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. युवराज परतानी याने पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार यांना “मी कोण आहे, ते तुम्हाला दाखवून देतो व माझी पावर वापरुन तुमची नोकरी घालवतो,” अशी धमकी दिली.
तसेच मानसी हिने पोलिसांना शिवीगाळ केली. यावेळी बार मॅनेजर यांनी ही या दोघांनी हॉटेलमध्ये शिवीगाळ केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी घेऊन जात असताना मानसी हिने महिला अंमलदार यांना “तू मला विचारणारी कोण, तु माझ्याशी अशा शब्दात बोलू नको,” असे बोलून पुन्हा गोंधळ घातला. फिर्यादी यांनी आपण वैद्यकीय उपचाराकरीता जाणार आहात याबाबत विचारले असता मानसी हिने फिर्यादी यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला. ‘‘मी सुसाईड करुन बाणेर पोलीस स्टेशन, तुम्हा सर्व पोलिसांची नावे लिहिणार’’ असे म्हणून पोलिसांना धमकी दिली. त्यानंतर दोघांनी आम्ही उद्या सकाळी उपचार घेऊन पोलीस ठाण्यात येऊ असे सांगितले. त्यानंतर ते अजूनपर्यंत परत पोलीस ठाण्यात आले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक पाथरे तपास करीत आहेत.
घर ताज्या बातम्या बारमध्ये मारहाण झाल्याचा आरोप करुन पोलीस ठाण्यात महिला पीएसआयच्या युनिफॉर्मला हात घालून...























