पुणे : मुंबई–बेंगळुरू महामार्गालगत प्रभागात विकसित करण्यात येत असलेल्या १२ मीटर सर्व्हिस रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज केली. या पाहणीदरम्यान National Highways Authority of India (NHAI) च्या अधिकाऱ्यांसह कामाची प्रगती आणि अडचणींचा आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी व जागाधारक यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व्हिस रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली बाधित जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जमीनमालकांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत सर्व जमीनमालकांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
सदर १२ मीटर सर्व्हिस रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पाहणीवेळी NHAI चे समन्वयक विनोद पाटील, स्थानिक जागाधारक गणेश पाडाळे, नितेश पाडाळे, सतीश पाडाळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
























