पुणे | प्रतिनिधी: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग व व्यापार क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र पाठवले आहे.
माने यांनी पत्रात नमूद केले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे आखाती देशांकडून भारतात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून रासायनिक खतांचा पुरवठाही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उद्योग, वाहतूक तसेच शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच अन्नधान्य आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजेसाठी लागणाऱ्या कोळशाच्या टंचाईचा धोका देखील त्यांनी अधोरेखित केला असून, त्यामुळे ऊर्जा व वीजपुरवठा क्षेत्रावर ताण येऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उद्योग संस्था, व्यापारी प्रतिनिधी तसेच पेट्रोलियम व संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण घडामोडींवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करून जनतेतील भीती दूर करण्याचे प्रयत्न करावेत, अशीही सूचना माने यांनी केली आहे.
दरम्यान, युद्धाची तीव्रता वाढल्यास राज्यातील आर्थिक चक्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून उद्योग व व्यापार क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.























