पुणे : कर्वेनगर येथील समर्थ पथ परिसरात पुन्हा एकदा पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः प्रतिज्ञा मंगल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे इमारतींमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी विजेच्या मीटरपर्यंत पाणी पोहोचल्याने वीजपुरवठा बंद करण्याची वेळ आली आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन देत प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सन 2023 मध्ये याच परिसरात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत उपाययोजना केल्या होत्या. त्यानंतर मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, सुमारे 100 मीटरचे काम अपूर्ण राहिल्याने पुन्हा नागरिकांना त्याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून गटारात अडकलेला कचरा काढताच तात्काळ पाण्याचा निचरा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पावसाळी लाईन सफाईवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित “सफाई” कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना आखून पुढील तीन महिन्यांत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

























