महिला अभियंत्यांसाठी नवे पर्व: आयईईई महिला अभियंता गट व संगणकीय बुद्धिमत्ता संघ अध्याय उद्घाटन

पुणे: भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आयईईई महिला अभियंता गट व संगणकीय बुद्धिमत्ता संघ अध्यायाचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. सरस्वती वंदनेने वातावरण भक्तिमय झाले, तर भारती विद्यापीठ गीताने एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.

प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता अशा उपक्रमांमधून नवे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. सातत्याने शिकत राहणे आणि नव्या संधींचा शोध घेणे हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मार्गदर्शन सत्रात डॉ. ज्योती कंजाळकर यांनी उद्योग क्षेत्राच्या गरजांची जाणीव करून दिली. डॉ. सिमरन खियानी यांनी विविध संधी व उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना नवकल्पना आणि कौशल्यविकासासाठी प्रेरित केले. श्री. अशोका विठ्ठल यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रा. डॉ. विजया पवार यांनी आयईईई संस्थेची ओळख करून देत तिच्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा. केतकी माळगी यांनी महिला अभियंता गटाच्या कार्याचा आढावा सादर केला, तर प्रा. किरण येसुगडे यांनी संगणकीय बुद्धिमत्ता संघ अध्यायाच्या उद्दिष्टे आणि उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा लहासे आणि नेहल जोगड यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. श्वेता साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

See also  ‘एनएसएफडीसी’च्या शिष्टमंडळाची बार्टी संस्थेस भेट