वडगाव मावळ परिसरात बिननंबर प्लेट गाड्यांचा सुळसुळाट; कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरात बिननंबर प्लेटच्या गाड्या मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचे चित्र समोर येत असून, महामार्गांवर या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. नियमांचे उघड उल्लंघन करूनही अशा वाहनांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

परिसरात अनेक वाहनांना काळ्या काचा लावण्यात आल्याचेही दिसून येत आहे. बिननंबर प्लेट व काळ्या काचा असलेल्या गाड्या मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मावळ तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अशा वाहनांचा वापर गैरप्रकारांसाठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या मते, काही प्रकरणांमध्ये राजकीय वशिल्यामुळे अशा गाड्यांवर कारवाई टाळली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा धाक कमी झाल्याचेही नागरिक सांगत आहेत. परिणामी, नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने कठोर पावले उचलून बिननंबर प्लेट व नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच महामार्गांवर नियमित तपासणी मोहीम राबवून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

See also  मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, समाजशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन