संगमवाडी प्रवेशद्वारावरील पाणी तुंबण्याच्या समस्येकडे मनसेचे लक्षवेधी निवेदन

पुणे : संगमवाडी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या गंभीर पाणी तुंबण्याच्या समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवघा अर्धा तास पाऊस झाला तरी या ठिकाणी गुडघाभर पाणी साचत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सदर रस्त्याचा भाग खोलगट असल्याने पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. पाणी साचल्यामुळे गावात ये-जा करणे कठीण होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. काही वाहनचालक पाण्यातून वेगाने वाहने चालवत असल्याने घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडते व त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये वाद होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

या समस्येबाबत यापूर्वीही महापालिका सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय यांना १९ सप्टेंबर २०२५ रोजी तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना १० ऑक्टोबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी मनसेच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. तसेच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनाही स्पीड पोस्टद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष ऍंथोनी आढाव, उपविभागाध्यक्ष गोकुळ अडागळे, संजय तोडमल, निलेश रणदिवे, शाखाध्यक्ष मिलन भोरडे, गोकुळ पवार, उमेश येवलेकर, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमवाडी येथील रस्ता तातडीने समतल करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनधिकृत बॅनरवर कारवाई चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल