बाणेर स्मशानभूमीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी जनरेटर बसविण्याची मागणी

पुणे : बाणेर येथील स्मशानभूमीमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने तेथे तातडीने स्वतंत्र जनरेटर सेट बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.

याबाबत त्यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अंत्यसंस्कार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना तसेच उपस्थित नागरिकांना मानसिक त्रास आणि गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
अंत्यसंस्कार ही अत्यंत संवेदनशील आणि भावनिक प्रक्रिया असल्याने अशा वेळी वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर बाब असल्याचे मुरकुटे यांनी नमूद केले आहे. तसेच या समस्येमुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत तातडीने स्वतंत्र जनरेटर सेटची व्यवस्था करून विद्युत दाहिनीचा अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. मानवी संवेदनांशी निगडित असलेल्या या विषयाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही जयेश मुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.

See also  कोथरूड मतदार संघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रचाराचा नारळ फोडून कामाला लागला – आमदार सचिन आहिर