पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, राजगड, तोरणा व इतर किल्ल्यावर व परिसरात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सिंहगड किल्ला व परिसरातील स्वच्छता मोहिमेत २८५ किलो सुका कचरा (प्लास्टिक कचरा) संकलित केला असून पुणे महानगरपालिका कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे देण्यात आला.
यामध्ये ग्रा. पं. सोरतापवाडीचे संरपच, ग्रामसेवक तसेच नागरीकांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सक्रिय सहभाग घेतला. मावळ तालुक्यातील लोहगड किल्ला येथेदेखील ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक तसेच नागरीकांनी स्वच्छता मोहिम राबवून कचरा संकलित केला.
जिल्ह्यातील सर्व गड किल्ल्यांना राज्य, देश विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरीक, अभ्यासक, इतिहासकार दैनंदिन भेटी देत असतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यातून, देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त, जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देवून अभिवादन करत असतात. याकरिता ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी गट, समन्वयक, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक तरुण मंडळे सहभागी होत आहेत.
जिल्ह्यातील नागरीक, पर्यटक व भाविक तसेच विद्यार्थी यांच्यामध्ये कचऱ्याबाबत जागरूकता व जबाबदारी निर्माण करून जिल्हा कचरामुक्त करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी दिली.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण-* जिल्ह्यातील सर्व किल्ले, ऐतिहासिक व पर्यटन स्थळी स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले असून सर्व गावे व परिसर कचरामुक्त रहावे याकरिता विशेष मोहिम राबविण्यात आलेली आहे.