दक्षिण कोकणात मान्सून दाखल; १५ जूनपर्यंत पावसाचा वेग मंदावण्याची शक्यता

पुणे, दि. ७ जून: दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील मान्सूनची प्रगती आणि पावसाचा जोर किमान १५ जूनपर्यंत कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १५ जूनपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना आणि वादळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असल्याने व्यापक क्षेत्रातील पेरणीसाठी पोषक ठरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून किमान १२ जूनपर्यंत कमाल तापमान उच्च पातळीवर राहणार आहे. विदर्भ आणि खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.

शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि उच्चदाब विद्युत वाहिन्यांच्या परिसरात थांबणे टाळावे. हवामान खात्याचे अद्ययावत अंदाज आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पुढील काही दिवस पावसाची अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी संयम बाळगून हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच कृषी नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  शहर भाजपच्या वचननाम्यालाच बजेटमध्ये बगल! - श्रीकांत वि.पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)पुणे शहर