पुणे, प्रतिनिधी : तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी पहाटे मोठी कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत सुमारे ६० ते ७० तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, विनापरवाना मद्यसेवन, मोठ्या आवाजात गोंगाट तसेच संशयित अंमली पदार्थांच्या वापराची माहिती समोर आली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या पार्टीबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या धाडीत सुमारे ३०० पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
छाप्यादरम्यान बंगल्यात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, डीजे साऊंड सिस्टिम आणि इतर साहित्य आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जणांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय असल्याने संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी आयोजकांसह संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा, ध्वनीप्रदूषण नियम आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, तुळापूर परिसरात सुरू असलेल्या अशा बेकायदा पार्ट्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
ठळक मुद्दे :
तुळापूर येथील बंगल्यात ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर छापा
६० ते ७० तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
विनापरवाना दारू व गोंगाट केल्याचा आरोप
अंमली पदार्थ सेवनाचा संशय; तपास सुरू
लोणीकंद पोलीस हद्दीतील कारवाईत ३०० पोलिसांचा सहभाग
आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
















