अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १४: केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून सांख्यिकी विभागाने सर्वेक्षणात महाविद्यालय, विद्यापीठांची माहिती अचूक भरून अभियान यशस्वीपणे राबावावे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.

उच्च शिक्षण संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व काही निवडक महाविद्यालये यांच्यासाठी अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सहाय्यक संचालक सौरभ कांत,  वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी शुभदा शर्मा, प्रोग्रामर शिवम पांडे, सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोराडे आदी उपस्थित होते.

श्री. देवळाणकर म्हणाले, आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील उच्च शिक्षण विभाग एका छताखाली आणण्यासाठी मदत होईल. सर्वेक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समूह गटात काम करावे. केंद्र शासनाने विकसित भारतासाठी 25 वर्षांचा आराखडा तयार केला आहे. हे सर्वेक्षणही त्याचाच भाग असून विकसित भारत अभियान यशस्वी करण्यासाठी  उच्च शिक्षण विभागाने योगदान देणे महत्त्वाचे आहे.

उच्च शिक्षण सर्वेक्षण देशाच्या शैक्षणिक नियोजनासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. राज्यात ४५ लाख विद्यार्थी आणि ८४ विद्यापीठे आहेत. सर्व ठिकाणची माहिती अचूक असावी, त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक काम करावे. देशातील अन्य राज्यांनी उदाहरण म्हणून आपल्या राज्याकडे पाहिले पाहिजे. सर्व उपस्थितांनी एक दिवसाचे प्रशिक्षण अतिशय गांभीर्याने घ्यावे. आपले काम देशासाठी उपयुक्त ठरेल याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माहिती संकलित करण्याचे काम खूप अवघड असून जास्तीत जास्त अचूक माहिती संकलित करण्यात यावी. नवीन धोरण आणि पुढच्या गोष्टीचे नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणातील माहिती खूप महत्त्वाची आहे. आजच्या कार्यशाळेमध्ये आपण डेटा व्यवस्थित कसा भरता येईल याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री. कांत म्हणाले, मागील वर्षात सर्वेक्षणाचे १०० टक्के उद्दिष्ठ साध्य केले आहे. यावर्षीही आपण सर्व मिळून उद्दिष्ट साध्य करूया. सर्वेक्षण महाविद्यालये आणि शिक्षकांच्या संख्येवर अवलंबून असल्याने माहिती भरतांना होणाऱ्या चुका टाळाव्या लागतील. कोणाला काही शंका असल्यास त्यांनी निरसन करून घ्यावे. माहितीत गुणवत्ता आणि अचुकता असणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.कोरडे यांनी सर्वेक्षणाविषयी माहिती दिली.

See also  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोरसासवड देशात प्रथम; लोणावळा तिसऱ्या स्थानी