पुणे, औंध : औंध येथे मोठ्या अपेक्षेने उभारण्यात आलेले पुण्यातील पहिले महिला कुस्ती केंद्र सध्या पुणे महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे धुळखात पडल्याचे चित्र आहे. महिला खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारलेली ही वास्तू आज दुर्लक्षित अवस्थेत असून क्रीडाप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे हे कुस्ती केंद्र औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दारू पार्ट्या आणि इतर अनधिकृत प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी उभारलेली वास्तू समाजकंटकांच्या अड्ड्यात रूपांतरित होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काही महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेने या वास्तूला सील केले होते. मात्र, त्यानंतरही केंद्राच्या भवितव्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी, लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेली ही सुविधा वापराविना पडून आहे.
महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्राचा तातडीने ताबा घेऊन आवश्यक दुरुस्ती व देखभाल करावी, तसेच ते पुन्हा सुरू करून महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी क्रीडा प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
“महिलांच्या क्रीडा विकासासाठी उभारलेले केंद्र बंद अवस्थेत असताना त्याठिकाणी अनधिकृत हालचाली सुरू असणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
— पुणे बुलेटीन


















