इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

रायगड-अलिबाग : पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी संवाद घडला. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासपूर्ण प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थी म्हणून भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत-सोडवत त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला. समाजात सकारात्मक बदल घडवून आणताना संघर्ष अपरिहार्य असतो, मात्र चांगल्या कार्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

डिजिटल युगातील शिक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल शिक्षण हे काळाची गरज असून भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. कार्यक्रमादरम्यान शाळेतील आयडियल सेंटर लॅबचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून विषय अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील. तसेच प्रश्नोत्तरे, स्वमूल्यमापन आणि ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने शिक्षण अधिक दर्जेदार आणि आकर्षक होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी डिजिटल लॅबचा नियमित वापर करून ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहन केले.

See also  डॉ. नमिता कोहक यांचे बाणेर येथे समर्थ व्याख्यानमाला व कपिला अखिला क्लब हाऊसच्या वतीने व्याख्यान संपन्न

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची आणि मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थिनीने घेतलेली ही मुलाखत आणि त्यातून मिळालेला प्रेरणादायी संदेश हा शाळा प्रवेशोत्सवाचा विशेष आकर्षण ठरला.