पुणे, दि. २ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या पुणे मेट्रोच्या विस्ताराचा महत्त्वपूर्ण टप्पा उद्या, मंगळवार (दि. ३ नोव्हेंबर) पार पडणार आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका क्रमांक ३ चे उद्घाटन तसेच पुणे मेट्रो टप्पा-२ मधील चार नव्या मार्गिकांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता बॅडमिंटन हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
चार नव्या मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ), रामवाडी ते विठ्ठलवाडी (मार्गिका २ब), खराडी ते खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप ते माणिकबाग (मार्गिका ४अ) या चार मार्गिकांच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे जाळे अधिक विस्तारणार असून भविष्यात सार्वजनिक वाहतुकीला पर्याय उपलब्ध होणार आहे.
या सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार तथा ऊर्जा मंत्री मनोहर लाल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढता वेळ लक्षात घेता मेट्रोच्या विस्ताराच्या दृष्टीने हा सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या मार्गिकांच्या कामांना सुरुवात झाल्यानंतर पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














