शिवसेना ‘उबाठा’वर फुटीची छाया

मुंबई -विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घडामोडी नवी दिल्ली येथे घडत आहेत. त्याचा परिणाम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर होणार असून त्यांचे पाच किंवा सात खासदार फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अजूनही चालू आहे.

पक्ष फुटीच्या बातम्या दिल्ली आणि महाराष्ट्रात पसरल्या. ठाकरे गटाचे नऊ पैकी कोणते संभाव्य खासदार फुटणार, त्यांची नावेही प्रसिद्ध होऊ लागली. त्यात ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दीना पाटील यांची नावे आहेत. हे सर्वजण ठाकरे गटाला रामराम करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार की थेट भाजपत जाणार याच्या चर्चा झडत आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणे आवश्यक आहे, संभाव्य पाचजणांची नावे चर्चेत आहेत, सहावे नाव कोणाचे असावे? याबाबत उत्सुकता आहे.

या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. बैठकीला नऊ पैकी चारच खासदार उपस्थित राहिले. बैठकीची वेळ दुपारी ११ वाजताची होती आणि पक्षाचे मुंबईतीलच खासदार संजय दीना पाटील दुपारी दीड वाजता आले. निंबाळकर, जाधव, देशमुख, वाघचौरे हे बैठकीत ऑनलाईन सामील झाले. यावर टीपणी करताना पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, ते बैठकीसाठी ऑनलाईन सामील झाले, तर बिघडले कुठे?

खासदार वाकचौरे यांनी पक्षाच्या शिर्डी येथील मेळाव्याकडे पाठ फिरवली होती, अशी माहिती मिळाली आहे. मुलीच्या लग्नाच्या तयारीचे कारण देऊन एक खासदार ठाकरे यांच्या बैठकीला आले नाहीत, पण ते दिल्लीत जावून शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चा करून आले. या हालचालींमुळे शिवसेना (उबाठा) पक्षावर फुटीचे सावट आहेच आणि राऊत यांनी वारंवार खुलासे केले तरीही पक्षफुटीची चर्चा आहेच.

भाजप फोडाफोडीचे राजकारण करतच आहे, असाही आरोप राऊत यांनी केला आहे.

See also  "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा ( पीस मार्च ) आयोजन "