राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत-अपर मुख्य सचिव राजेश कुमार

पुणे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने संस्था स्वबळावर उभी करण्यासाठी उत्पन्नाची नवीन साधने शोधावीत आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत, असे प्रतिपादन सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.

राजेश कुमार यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, संचालक डॉ. सुभाष घुले, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

राजेश कुमार म्हणाले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. दूरच्या प्रशिक्षणार्थीना लाभ मिळण्यासाठी संस्थेने समाज माध्यमाचा वापर वाढवावा. ‘मॅग्नेट’ प्रकल्पातून संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी काही घटक घेता येतील का याचाही विचार करावा. राज्यात काही ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू करता येतील का याचीही चाचपणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

श्री. कोकरे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेत १३ विषयावरील प्रशिक्षण देण्यात येत असून आजपर्यंत संस्थेने ६१ हजार ३०० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान ही संस्था पणन मंडळाने १९९८ मध्ये स्थापन केली असून बाहेरच्या राज्यातील प्रशिक्षणार्थीही मोठ्या प्रमाणात येथे प्रशिक्षणासाठी येत असतात, अशी माहिती श्री.कदम यांनी दिली.

डॉ. घुले यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी राजेश कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

See also  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट