पुणे, दि. १९ जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी रात्री दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी रात्री १०.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये तब्बल ४० वर्षे सेवा बजावली होती. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबरोबरच ते एक नामवंत पैलवान म्हणूनही परिचित होते. त्यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबीयांवर तसेच सहकार आणि क्रीडा क्षेत्रातील अनेकांवर शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज, शुक्रवार दि. १९ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील वेणूकृष्णा निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.त्यानंतर सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
किसनराव मोहोळ यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुणे बुलेटिन परिवाराकडूनही दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.















