मोदी साहेब देशाच्या सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादी मधील भ्रष्टाचारी असलेल्यांना हवी ती शिक्षा द्या त्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा राहील – शरद पवार

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद जनतेसोबत या झंझावात दौऱ्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील येवला येथून झाली आहे. शरद पवार यांनी सुरु केलेल्या या दौऱ्यातील पहील्या सभा पार पडली. पवार यांनी त्यांच्यासोबत या भागातील काम केलेल्या अनेक ज्येष्ठ मंडळींचे उल्लेख करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांनी गेली अनेक वर्षे पुरोगामी विचाराला साथ दिली त्यामध्ये नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर येतो. या जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, आदिवासी या सर्वांवर जरी संकटे आली तरी त्यांनी साथ सोडली नाही असे पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, मुंबईमध्ये काही लोकांना जनतेसमोर सादर केल्यावर यश मिळवता आले नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचे असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही येवल्याची निवड केली. इथे निवडणुकीसाठी दिलेली नावे कधी चुकली नाहीत. पण एका नावाने घोटाळा झाला. त्याठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला. त्यासाठी आज मी इथे माफी मागण्यासाठी आलोय. आगामी काळात लोकांसमोर जायची वेळ येईल तेव्हा मी चुक न करता योग्य निकाल सांगेल ज्यातून या भागातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली जाईल.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या आरोपाबद्दल ते म्हणाले की पक्षाचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी जे आरोप केले त्यांना तुमच्या हाती असलेल्या देशाच्या सत्तेच्या माध्यमातून हवी ती शिक्षा द्यावी. त्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा राहील, असा दावा त्यांनी केला. ज्या जनतेने निवडून दिले, ज्या जनतेला वचन दिले त्या जनतेच्या विश्वासाला तडा बसणारे पाऊल तुम्ही टाकलं असेल तर ती गोष्ट आम्ही सहन करणार नाही. ती गोष्ट कोणी करत असेल तर त्यांना त्यांची किंमत आज ना उद्या द्यावी लागेल. तो इतिहास इथे घडेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यानंतर येवल्यामध्ये कांद्याचे क्रेट पाहिल्यावर वर्षभर केंद्र सरकारशी कांद्याच्या भावावर भांडण केल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सर्वांना करून दिली. जगात कांदा कमी आहे, आपल्या देशात कांदा उत्पादन जास्त झाले असल्याने आपला कांदा परदेशात पाठवण्याची मागणी करूनही भारतीय जनता पक्षाने कांदा बाहेर जाऊ न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असा थेट आरोप सुप्रियाताईंनी केंद्र सरकारवर केला. कांद्यासोबत शेतकऱ्यांच्या टोमॅटोला भाव देत नाही. शहरात टोमॅटो महागले आहेत मग मधले पैसे जातात कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

See also  मोदींची गॅरंटी खोटी; ती चालणार नाही भाजपाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाही - शरद पवार

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या विचारांशी माझी निष्ठा आहे. मला पद नाही मिळाले तरी माझा विचार मी कधी सोडणार नाही. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणारा हक्काचा माणूस शरद पवार साहेब आहेत. त्यांच्याविरोधात षडयंत्र सुरु आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या विकासाविरोधात आणि आपल्या राज्याचे महत्व करण्याचे षडयंत्र दिल्लीचा अदृश्य हात करतोय. समोर कोणीही बसले असेल तरी त्याविरोधात लढा दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. सेवा, सन्मान, आणि स्वाभिमान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्याचा अंत आपण करणार, असा सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट ईशारा दिला.

माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी सभेला मार्गदर्शन करताना नाशिक जिल्हा आणि शरद पवार यांच्या नात्याला उजाळा दिला. शरद पवार साहेबांनी जेव्हा-जेव्हा नाशिककरांना हाक दिली आहे तेव्हा नाशिककरांनी १४ -१४ आमदार पवार साहेबांच्या मागे उभे केले. साहेबांचे हात महाराष्ट्रामध्ये मजबूत नाशिककरांनी केले आहेत. ज्यानाशिक जिल्ह्याने स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना बिनविरोध निवडून दिले तोच नाशिक जिल्हा पवार साहेबांचा एकही शब्द महाविकास आघाडीच्या माध्यमातून खाली पडू देणार नाही, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली.

आजची सुरु असलेली लढाई ही नात्यांची नाही तर नीती आणि अनितीची, धर्माची आणि अधर्माची आहे या शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी सभेला उपस्थित कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला. वारंवार पक्ष फोडले जात आहेत, वारंवार आमदार पळवले जातात याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. नऊ वर्ष सत्तेत राहूनही मोदी सरकारने काय केले याची वस्तूस्थिती कोल्हे यांनी मांडली. देशातील अनेक राज्यात भाजप हद्दपार होऊ लागला आहे. विकासासाठी गेलेले लोक महागाई कमी करणार का? काद्यांला भाव देणार का? या प्रश्नाची उत्तर ते देतील का असे खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आजची सभा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. जेव्हा बाप लढायला उतरतो तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा देण्याची जबाबदारी लेकाची असते, असे ते म्हणाले.

See also  निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

या सभेला आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल भुसारा, कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार मारुतीराव पवार, माजी आमदार हेमंत टकले, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.