पुणे : महिला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र-गोवा विभागातर्फे सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज – विमेन’ पुरस्कार भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे या महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे महिला तंत्रशिक्षण क्षेत्रातील महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण आणि यशस्वी वाटचालीवर पुन्हा एकदा मानाची मोहोर उमटली आहे.
हा पुरस्कार इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र-गोवा विभागाचे सचिव प्रा. के. पी. कुंभार आणि अध्यक्ष डॉ. रंजीत के. सावंत यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी स्वीकारला.
महिला विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देणे, संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे, उद्योगाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे या महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनाभिमुख वातावरण, कौशल्यविकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण योगदान या यशामागील प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “हा सन्मान संपूर्ण महाविद्यालय परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी आणि पालक यांच्या सहकार्यामुळेच हा गौरवशाली क्षण अनुभवता आला आहे. हा पुरस्कार भविष्यात अधिक जोमाने आणि नव्या उमेदीने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. भारती विद्यापीठ व्यवस्थापनाने वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे.”
या उल्लेखनीय यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम तसेच भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव आणि महाविद्यालय परिवाराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला मिळालेला हा बहुमान संपूर्ण भारती विद्यापीठ परिवारासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात महाविद्यालय भविष्यातही नवे मानदंड निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
या पुरस्कारामुळे भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणेच्या शैक्षणिक यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्यविकास यांच्या माध्यमातून सक्षम व गुणवंत अभियंते घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
















