आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘पंजाब दौऱ्याचे’ विमान तिकीट भेट

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन ‘पंजाबचे प्रतीकात्मक विमान तिकीट’ व दिल्ली मॉडेल हे पुस्तक भेट दिले. आप सरकारने सुधारलेल्या पंजाब, दिल्लीमधील सरकारी शाळा बघण्याचे निमंत्रण आम आदमी पार्टीने मा. चंद्रकांत पाटील यांना दिले.

याप्रसंगी आपच्या वतीने म्हटले की, “सरकारी शाळा सुधारता येत नाहीत, हा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समज चुकीचा आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने हजारो सरकारी शाळांचा कायापालट करून दाखवला आहे. पंजाबच्या शाळांचा नीति आयोगाच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक आला आहे. तर आप सरकारच्या कार्यकाळात दिल्लीत तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी खाजगी शाळा सोडून सरकारी शाळांत प्रवेश घेतला. आम आदमी पार्टीचे शिक्षण व्यवस्था परिवर्तनाचे मॉडेल जागतिक पातळीवर तज्ञांकडून नावाजले गेले आहे.”

शिक्षणमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पंजाबला जाऊन शाळांमधील स्मार्ट क्लास, प्रयोगशाळा, शिक्षक प्रशिक्षण आणि ‘हॅपिनेस करिक्युलम’ या उपक्रमांची पाहणी करावी. तसेच पुणे मनपाच्या शाळांतील शिक्षकांची ३२० रिक्त पदे, ४० टक्के शाळांना मुख्याध्यापक नसल्याची गंभीर स्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहावी. “खासगीकरण हा उपाय नसून मनपा शाळांमध्ये आर्थिक गुंतवणूक आणि राजकीय इच्छाशक्ती हा उपाय आहे,” असे आपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आपने चंद्रकांत पाटील यांना आवाहन केले की, त्यांनी वेळ द्यावी आणि पंजाब दौरा करावा. या दौऱ्याची सर्व जबाबदारी आम आदमी पार्टी उचलेल. “मनपा शाळांचे खासगीकरण म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची कबुली आहे. पण पंजाब-दिल्ली मॉडेल पाहिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची भूमिका बदलेल, असा आम्हाला विश्वास आहे,” असेही आपने यावेळी सांगितले.

यावेळी डॉ अभिजीत मोरे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, धनंजय बेनकर, संजय कोने, आरती करंजावणे, सुरेखा भोसले, प्रदीप उदागे, अमोल मोरे, कृणाल घारे, सुहास पवार, शंतनू पांडे, सतीश यादव, सुनील सवदी, नितीन कुटे पाटील, किरण कद्रे, गणेश थरकुडे, ऋषीकेश कनवटे, ऋषीकेश मारणे, शंकर थोरात, निखिल खंदारे, विनोद शिवनकर, कुमार धोंगडे, उपस्थित होते.

See also  सत्तेसाठी "भाजपबरोबर जाऊन बसायचं" ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. -शरद पवार