पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयास्पद दुचाकीचा पाठलाग करुन सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत असताना त्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्यावर चाकूहल्ला केला. तेव्हा गणेश रायकर यांनी आपल्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. गुन्हेगाराचा डाव्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. यावेळी त्याच्या साथीदाराने पोलीस हवालदाराच्या अंगावर दुचाकी घालून पळून गेला. ही घटना रामटेकडीतील आनंदनगर येथील गल्ली ५ मधील रोडवर रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. पळून गेलेला साथीदार एनकॉऊंटरच्या भितीने रविवारी रात्री वानवडी पोलीस ठाण्यात हजर झाला.
गणेश पंडित रायकर (वय ३८) असे जखमी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक यांचे नाव आहे. ते सध्या बाणेर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चाकू हल्ल्यात त्यांच्या डाव्यावर खांद्याला जखम झाली आहे. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन करणसिंग रजपूतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) आणि बिंतुसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणसिंग दुधानी याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर, बिंतुसिंग कल्याणी याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांनी सांगितले की, बाणेरमधील घरफोडी करण्यासाठी चोरटे हे दुचाकीवरुन आले असल्याचे निष्पन्न झाले होते. कायनेटिक कंपनीची ही दुचाकी युनिक असल्याने ती लक्षात राहील अशी होती. तिच्या मालकाला फोन केल्यावर त्याने आपली गाडी चोरीला गेल्याचे सांगितले. मागच्या रविवारी गुन्हा घडला असल्याने चोरटे या रविवारी सुद्धा चोरीचा प्रयत्न करतील, या विचाराने आम्ही मध्यरात्रीपासून आरोपींचा शोध घेत होतो. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वानवडी परिसरात आमच्या पुढे याच चोरीच्या दुचाकीवरुन दोघे जण जाताना दिसले. आम्ही त्यांचा पाठलाग सुरु केला. पोलिसांची गाडी मागून येत असल्याचे पाहून ते आणखी जोरात जाऊ लागले. आम्ही रामटेकडी येथील आनंदनगरमधील एका गल्लीत त्यांच्यापुढे गाडी घालून दुचाकी अडविली. खाली उतरून त्यांच्याकडे जात असताना एका आरोपीने (करणसिंग दुधानी) त्याच्याकडील चाकूने माझ्यावर हल्ला केला. डाव्या खांद्याला जखम झाली. तो धिप्पाड आणि आडदांड आहे. त्यामुळे जर त्याला संधी दिली तर तो आपल्यावर आणखी हल्ला करेल, असा क्षणभरात विचार करुन मी सरकारी पिस्तुल काढून त्यांच्या पायावर एक गोळी झाडली. ती त्याच्या डाव्या पायाला लागली. तो जागेवरच पडला. गोळीबाराच्या आवाजाने लोक येऊ लागली. ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. तातडीने पोलिसांची मदत आली. त्याला व मला ससून रुग्णालयात आणण्यात आले. आता माझी तब्येत व्यवस्थित आहे.
बाणेर पाषाण लिंक रोडवरील व्हेंलेन्सीया अपार्टमेंट येथे १४ व १५ जूनच्या दरम्यान घरफोडी करुन ५ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत मिलिन दिलीप गडा (वय ३५) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्याकडे होता. या गुन्ह्याचा तपास करताना त्यांना एका संशयित दुचाकी तेथे आढळून आली. गणेश रायकर व पोलीस हवालदार बाबासाहेब आहेर हे गुन्हेगारांचा शोध असताना चोरलेल्या या गाडीवरुन जाताना दोघे जण दिसले. त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आनंदनगर मधील एका गल्लीमध्ये त्यांनी पोलीस व्हॅन आडवी घालून त्यांना रोखले. गणेश रायकर हे खाली उतरुन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेले असताना पाठीमागे बसलेल्या करणसिंग दुधानी याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला.
- त्यांच्या डाव्या खांद्यावर जखमी झाली. प्रसंग लक्षात घेऊन आरोपी पळून जाऊ नये व त्याने आणखी हल्ला करु नये, म्हणून रायकर यांनी पिस्तुलातून गोळी झाडली. ती करणसिंग दुधानी याच्या डाव्या पायाला लावून तो जखमी झाला. बिंतुसिंग कल्याणी याने दुचाकी पोलीस हवालदार बाबासाहेब आहेर यांच्यावर घालून मारण्याचा प्रयत्न करुन तो पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक दादासाहेब डाबेराव व त्यांच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. गणेश रायकर व करणसिंग दुधानी यांना तातडीने ससुन रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघा आरोपींवर घरफोडी, दरोडा, मारहाण यासारखे ३२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक दादासाहेब डाबेराव तपास करीत आहेत.















