सजग ग्रामस्थांमुळे टळला मोठा अनर्थ; पुलाला अडकलेले ओंडके हटवून वाचवला संपर्कमार्ग

महाबळेश्वर, प्रतिनिधी: मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील बिरमणी गावाचा संपर्क तुटला असून, पुलाच्या कठड्यांना मोठ्या प्रमाणात लाकडी ओंडके अडकून पुलाला धोका निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटनेची चाहूल लागताच गावातील सजग नागरिकांनी तत्काळ पुढाकार घेत मोठे ओंडके हटवून पुलावरील ताण कमी केला.

पुलाच्या कठड्यांना अडकलेल्या लाकडांमुळे पुलाचे नुकसान होण्याची तसेच संपर्क पूर्णपणे खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ग्रामस्थांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत एकत्रित प्रयत्नांतून पुलाला अडकलेले मोठे लाकडी ओंडके काढून संभाव्य अनर्थ टाळला.

या धाडसी कार्यात श्रीरंग मोरे, अनिल घाडगे, प्रदीप मोरे, भागोजी मोरे, मनोहर घाडगे आणि प्रकाश मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे पुलावरील धोका कमी झाला असून ग्रामस्थांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे बिरमणी गावाचा संपर्क अद्याप विस्कळीत असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

See also  मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस; जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस सेवेचे उद्घाटन