मुठा खिंडीत महावितरणचा वीजखांब धोकादायक अवस्थेत; दुर्घटनेपूर्वी तातडीने कारवाईची मागणी

मुळशी, प्रतिनिधी: मुळशी तालुक्यातील मुठा खिंडीत लवासा रोडवर महावितरणचा एक वीजखांब अत्यंत धोकादायक अवस्थेत उभा असून, कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वीजखांबाच्या तळाशी असलेले सिमेंट पूर्णपणे निघून गेले असून केवळ मातीच दिसत आहे. हा खांब रस्त्यालगतच्या पावसाच्या गटारात असल्याने पावसाच्या पाण्यामुळे त्याचा पाया आणखी कमकुवत झाला आहे. त्यामुळे हा खांब कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लवासा रोड हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक व वाहनांची ये-जा असते. अशा परिस्थितीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित वीजखांब तातडीने बदलावा किंवा सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित कुडले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राम गायकवाड, तसेच समीर शिंदे, सार्थक दिघे, विजय मारणे, श्याम येणपुरे, शिवाजी गुंड आणि बाळासाहेब चोरगे यांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशारा दिला आहे.

See also  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलमध्ये कॅमेरा प्रणालीचे उद्घाटन