विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी शरद पवारांची भेट; जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस, मागण्यांवर संवेदनशील निर्णय घेण्याची मागणी

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्ते अभिजीत दिपके व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी शरद पवार यांनी आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

शरद पवार यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी झालेली पोलिसांची वागणूक लोकशाही मूल्यांना साजेशी नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला असून सरकार आणि प्रशासन हे जनतेप्रती उत्तरदायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारने आंदोलनकर्त्यांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या पोलिस कारवाईमुळे या प्रकरणावर देशभरात राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांचे नेते आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेट देत आहेत.

See also  बाणेर येथे "माझी लाडकी बहीण" योजनेच्या समर्थनार्थ पूनम विधाते यांच्या वतीने आयोजित स्वाक्षरी मोहिमेस महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद