‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ विविध कार्यक्रमांच्या आयोजनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष नागरिककेंद्रित झाले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा पात्र नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचवून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यास प्राधान्य द्यावे. अभियानातील प्रत्येक उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरांचे नियोजन करावे तसेच इतर सर्व विभागांनी  केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा पात्रतेनुसार लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शक्य त्या सेवा शिबिराच्या ठिकाणीच उपलब्ध करून द्याव्यात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचेही नियोजन करावे.

वन हक्क दाव्यांच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वन हक्क समित्यांच्या बैठका घेऊन नवीन दावे तसेच पूर्वीच्या दाव्यांमधील दुरुस्तीची कार्यवाही गतिमान करावी. मंजूर वन हक्क दाव्यांनुसार अधिकार अभिलेख तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. प्रलंबित दावे अभियान कालावधीत निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी निश्चित वेळापत्रक तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.

‘सेवा सेतू’ शिबिरांच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, पाणंद रस्ते, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, वन हक्क दावे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नवीन नळ जोडणी, घरगुती वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचतगट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासह शासन निर्णयात नमूद सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

See also  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकचे भाडे आकारणी करणाऱ्या खासगी वाहतुकदारांविरुद्ध तक्रारी करण्याचे आवाहन

‘सेवा माझे योगदान’मधून लोकसहभाग वाढवा
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमातून गाव आणि वॉर्ड स्तरावर व्यापक लोकसहभाग निर्माण करावा. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींना सहभागी करून घ्यावे. स्थानिक गरजेनुसार रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ‘स्वच्छता ही सेवा’, आरोग्य तपासणी, योग व ध्यान, प्लास्टिकमुक्ती जागृती, महिला आरोग्य व स्वच्छता, वंचित मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य, करिअर समुपदेशन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता यासारखे उपक्रम राबवावेत.

अवयवदान संकल्प अभियान, व्यसनमुक्त भारत जागृती, पोषण व ॲनिमिया जागृती, रस्ता सुरक्षा, जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा, ‘फिट इंडिया’ खेळ सत्र, वीरगाथा व सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग, मतदार जागृती व नोंदणी, ‘व्होकल फॉर लोकल’, शासकीय योजनांची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासारख्या उपक्रमांचेही स्थानिक गरजेनुसार नियोजन करावे. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी, तर शहरी भागात मुख्याधिकारी अथवा वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

ग्रामपातळीवर लोकसहभागातून अभियान प्रभावीपणे राबवा
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील यंत्रणांनी ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. ‘सेवा माझे योगदान’ अंतर्गत गावागावांत स्थानिक गरजेनुसार स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य, जलसंधारण, प्लास्टिकमुक्ती, डिजिटल साक्षरता आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीचे उपक्रम लोकसहभागातून राबवावेत.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविणे, ग्रामस्तरावर व्यापक लोकसहभाग निर्माण करणे आणि राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे प्रभावी दस्तऐवजीकरण करणे यावर विशेष भर द्यावा. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने अभियानातील उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

‘बदलाची गोष्ट’मधून यशोगाथा संकलित करा
शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रम राबवावा. योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांच्या ‘बदलाची गोष्ट’ स्वरूपातील यशोगाथा संकलित कराव्यात. लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया नावासह व्हिडिओ स्वरूपात नोंदवून व्हिडिओ व रिल्स तयार करावेत. तालुका व जिल्हास्तरावर योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विभागांनी प्रभावी यशोगाथा संकलित कराव्यात.

See also  पुण्यातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून पर्यावरणपूरक बनवणार; पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उदघाटन

शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित करावेत. स्थानिक कलाकार, विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग वाढवावा. २ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे.

‘अंगणवाडी उत्सवा’तून आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती
‘अंगणवाडी उत्सव’ उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांनाही सहभागी करून घ्यावे. महिलांना आरोग्य व पोषणविषयक योजनांची माहिती द्यावी. लहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करावेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करावा. लाभार्थी महिलांना शासनाच्या पोषण व आरोग्य योजनांमुळे झालेल्या लाभाचे अनुभव कथन करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रे’चे सूक्ष्म नियोजन करा
पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रे’चे विशेष व सूक्ष्म नियोजन करावे. यात्रा जिल्ह्यातून जाणार असल्याने यात्रेचे स्वागत करण्याबरोबरच जिल्ह्यातील स्थानिक योजना आणि विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम आयोजित करावा. यात्रेतील एलईडी स्क्रीनद्वारे माहितीपट दाखविण्याची व्यवस्था करावी.

यात्रेचा मार्ग, स्वागतस्थळे, कार्यक्रमस्थळे, आवश्यक सुविधा आणि विविध विभागांतील समन्वय याबाबत संबंधित यंत्रणांनी आगाऊ नियोजन करावे. अभियानातील प्रत्येक उपक्रमासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करावी.

उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि दस्तऐवजीकरणावर भर
अभियानातील कार्यक्रम केवळ संख्यात्मक स्वरूपात न राबविता त्यातून नागरिकांना प्रत्यक्ष सेवा आणि योजनांचा लाभ मिळणे महत्त्वाचे आहे. विशेषतः पात्र लाभार्थ्यांची ओळख, प्रलंबित अर्जांचा निपटारा आणि शक्य त्या सेवा शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. अभियानाचा लाभ शेवटच्या पात्र घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि रिल्सच्या माध्यमातून व्यवस्थित दस्तऐवजीकरण करावे. संबंधित विभागांनी आपल्या कामांचे व्हिडिओ चित्रीकरण, रिल्स व छायाचित्रे संकलित करून माहिती व जनसंपर्क यंत्रणेकडे वेळेत उपलब्ध करून द्यावीत.

See also  बीडीपी करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने पुणे महापालिकेने ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

अभियानातील प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी संबंधित विभागांनी निश्चित करून त्याची वेळेत पूर्तता करावी. अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि सेवा पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोकसहभागातून सामाजिक उपक्रमांना चालना देऊन ‘सेवा संकल्प अभियान’ अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.