प्रभाग क्र. १७ हडपसर–मांजरी परिसरातील विकासकामे, अतिक्रमण व वाहतूक समस्यांची प्रत्यक्ष पाहणी

पुणे : प्रभाग क्रमांक १७ हडपसर–मांजरी परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या अतिक्रमण, वाहतूक कोंडी तसेच विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने आज  प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. आगामी काळात या परिसरात मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक नियोजन करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.

स्थानिक नागरिक तसेच संबंधित लोकप्रतिनिधींकडून अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि विकासकामांबाबत सातत्याने सूचना व तक्रारी प्राप्त होत असल्याने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहणी करून विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पाहणीस मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, मा. अतिरिक्त आयुक्त (वि.) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (महामेट्रो) श्री. आशुतोष झा, हडपसर–मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्यक्ष श्री. प्रशांत तुपे, मा. सभासद डॉ. दादा कोद्रे, मा. अजित घुले, मा. सरिता घुले, मा. पायल तुपे, मा. नंदाताई अबनावे, मा. मारुती तुपे, मा. उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. अरविंद माळी, मा. उपायुक्त (भूसंपादन) श्री. निखिल मोरे, मा. उपायुक्त (अतिक्रमण) श्री. सोमनाथ बनकर, मा. उपायुक्त (मालमत्ता) श्री. प्रशांत ठोंबरे, मा. अधीक्षक अभियंता (पथ विभाग) श्री. अजय वायसे, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. कुणाल धुमाळ तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, अतिक्रमण, पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्यात येईल, तसेच मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

See also  औंध–बाणेर परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; हातगाड्या, वाहन व साहित्य जप्त