पुणे, प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला.
काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा”, “लोकशाही वाचवा”, “मोदी सरकारचा निषेध असो” अशा घोषणा देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आली.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईविरोधात देशभरातून विविध राजकीय पक्ष व विद्यार्थी संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून, त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.















