गोसावी वस्ती एसआरए योजनेतील अनियमिततेवर शिक्कामोर्तब?; रहिवाशांचा गंभीर आरोप, योजना रद्द करण्याची मागणी

पुणे, दि. 24 जुलै : गोसावी वस्ती, कोथरूड येथील झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनेत सुरुवातीपासूनच गैरमार्गांचा अवलंब करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) काढलेल्या शुद्धीपत्रकामुळे त्यांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, योजनेतील क्षेत्रफळ, मोजणी आणि कागदपत्रांबाबत अनेक त्रुटी असल्याची तक्रार त्यांनी वेळोवेळी प्राधिकरणाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर 17 जुलै 2026 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शुद्धीपत्रक (Notification/Correction Order) जारी करून पूर्वीच्या अंतिम आदेशामधील काही बाबींमध्ये दुरुस्ती केली आहे.

हा प्रकल्प केवळ आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला असून प्रशासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकामुळे योजनेतील त्रुटी अधिकृतपणे समोर आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण पुनर्वसन योजना रद्द करण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचा दावा त्यांनी केला.

यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी सांगितले. त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार असून, आवश्यक असल्यास या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण किंवा संबंधित विकासकाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांनी केलेले आरोप आणि प्रशासनाच्या भूमिकेचा पुढील तपशील समोर येणे अपेक्षित आहे.

See also  अस्सल मराठी लोककलांच्या जागरात रंगले 'द फोक आख्यान'- नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांचे आयोजन