स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले बहुमत हे काँग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच साध्य झाले असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कर्नाटक मधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या तसेच 3 पत्रकार परिषद घेतल्या. त्यावेळी काँग्रेस पूर्ण बहुमताने कर्नाटकात सत्ता स्थापन करेल अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच हा निकाल लागला आहे. असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. जर आम्ही काटावर असतो तर भाजप चा सत्तेसाठीचा घोडाबाजार झाला असता जो महाराष्ट्रासह अनेक राज्यात आपल्याला बघायला मिळाला आहे. ती शक्यता पूर्णपणे मावळली असून कर्नाटकच्या जनतेने भक्कम असे बहुमत काँग्रेसला दिलेले आहे. तरीसुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि तशी काँग्रेसकडून तयारी सुद्धा दिसत आहे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

कर्नाटक मधील भाजप सरकार पूर्ण भ्रष्टाचारी स्वरूपाचे सरकार होते आणि त्यांना उघडे करण्यात कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांना मोठे यश मिळाले आहे. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची रेट लिस्टच काँग्रेस ने वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केली होती. कर्नाटक मध्ये स्थानिक मुद्द्यावर निवडणूक काँग्रेस कडून लढविली गेली. बेरोजगारी व महागाई हे सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय होते त्यासाठी काँग्रेस कडून जाहीरनाम्यातून पाच गॅरंटी जाहिर करण्यात आल्या ज्यामधून कर्नाटक मधील जनतेला दिलासा मिळेल. या पाच योजना म्हणजे 200 युनिट फ्री मध्ये वीज, महिलांना रु 2000 महिना भत्ता, बीपील कुटुंबातील प्रती व्यक्ती 10 किलो धान्य, बेरोजगार असलेल्या पदवीधर युवकांना रु 3000 भत्ता तर डिप्लोमा होल्डर ना रु 1500 भत्ता ज्यामधून पुढील 2 वर्षात त्या युवकांला नोकरी मिळेपर्यंत ही रक्कम दिली जाईल तसेच महिलांना राज्यात मोफत बससेवा. अशा योजना काँग्रेस कडून जाहिर करण्यात आल्या होत्या याला जनतेने चांगली साथ दिली. असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाणेर-बालेवाडी २४x७ पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण