पुणे : पुणे महानगरपालिकेने पर्यावरण स्थिती अहवाल (Environmental Status Report – ESR) २०२५-२६ महासभेसमोर सादर केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६७-अ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अहवालात शहराच्या गेल्या वर्षभरातील पर्यावरणीय कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, भविष्यातील पर्यावरणीय नियोजनाचा आराखडाही मांडण्यात आला आहे.
यंदाचा अहवाल २९८ पानांचा असून पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वायू गुणवत्ता, स्वच्छ वाहतूक, हवामान बदल, जैवविविधता आणि आपत्ती व्यवस्थापन अशा ६० प्रमुख विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हा अहवाल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (STP) संस्थेच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.
अहवालानुसार, पुण्यात पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. २४x७ पाणीपुरवठा योजनेचा विस्तार, स्मार्ट वॉटर मीटर बसविणे आणि सुमारे ६०० किलोमीटर जलवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शहराला पुरविण्यात येणारे पाणी राष्ट्रीय गुणवत्तेच्या निकषांनुसार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सांडपाणी व्यवस्थापनात शहरातील नऊ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली असून नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपर्यंतही ही व्यवस्था पोहोचविण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत पुण्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात आठवे स्थान पटकावले आहे. शहरात दररोज सुमारे २,७७० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, अहवालाच्या कालावधीत कोणताही नवीन कचरा डेपो सुरू करण्यात आलेला नाही.
वायू गुणवत्तेबाबत गेल्या पाच वर्षांत पीएम २.५ आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) च्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर-आधारित निरीक्षण, उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी स्वच्छ इंधन वापर अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
स्वच्छ वाहतुकीच्या दिशेनेही पुण्याने महत्त्वाची पावले उचलली आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसांची संख्या ५३५ वर पोहोचली असून, नव्या वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण ६२ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या अहवालात प्रथमच हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनावर स्वतंत्र प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा यांसारख्या आपत्तींचा सामना करण्यासाठी रिअल-टाइम निरीक्षण प्रणाली, पूर्वसूचना यंत्रणा आणि तातडीच्या प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.
अहवाल तयार करताना शहरातील सुमारे १,६०० नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले. या सर्वेक्षणात नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, हरित क्षेत्र वाढविणे आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, “पर्यावरण स्थिती अहवाल हा केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून शाश्वत आणि पारदर्शक शहर विकासासाठी मार्गदर्शक आहे. वैज्ञानिक माहिती, विविध विभागांची कामगिरी आणि नागरिकांच्या सहभागाच्या आधारे तयार झालेला हा अहवाल भविष्यातील धोरणात्मक निर्णय अधिक परिणामकारक करण्यास मदत करेल.”
महापालिकेने स्पष्ट केले की, सार्वजनिक आरोग्य, पाणी, वाहतूक, ऊर्जा, घनकचरा आणि जैवविविधता या सर्व घटकांचा एकात्मिक विचार करून पर्यावरणीय नियोजन करण्याची गरज या अहवालातून अधोरेखित करण्यात आली असून, आगामी काळातील शाश्वत शहर विकासासाठी हा अहवाल महत्त्वाचा धोरणात्मक दस्तऐवज ठरणार आहे.














