पुणे : भाजपाच्या सत्ता कालावधीमध्ये पुणे शहरात पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग म्हणून शहरात सार्वजनिक सायकल शेअरिंग सिस्टीम लागू करण्यात आली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत पुणेकरांना दाखवण्यात आलेली सायकलिंगच्या शहरातील स्वप्ने सध्यातरी धुळीस मिळाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी चौका चौकात दिसणाऱ्या शेअरिंग सायकल देखील गायब झाल्या आहेत.
पुणे महानगरपालिका (पीएमसी), पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी ३५० कोटी रुपयांच्या निधी तरतुदीसह, एक व्यापक सायकल मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. या योजनेनुसार, पीएमसी पायाभूत सुविधा आणि सायकलिंग इकोसिस्टम तयार करेल ज्याचा वापर खाजगी ऑपरेटर करू शकतील, सायकल तैनात करतील आणि सायकल-शेअरिंग योजना चालवतील. ४७० किमी लांबीचे समर्पित सायकल ट्रॅक कामात आहेत, ७३ किमीचे विद्यमान ट्रॅक सायकल नेटवर्कमध्ये एकत्रित केले जातील. या उद्देशाने सामंजस्य करार खाजगी कंपन्यांशी करण्यात आले होते.
अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक पूर्ण करण्यात आलेले नाहीत. सायकल ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तर रस्त्याला लागून असलेल्या सायकल ट्रॅकच्या लाल पट्ट्यांमध्ये एकदा चार चाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. सलग सायकली चालवता येत नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पुणे शहरात कोट्यावधी रुपयांचा खर्च सायकल ट्रॅकवर करण्यात आला आहे. परंतू लहान मुले, नागरिक यांना सायकलने प्रवास करण्याचा आनंद सध्या उपलब्ध असलेल्या सायकल ट्रॅक वरील अडथळ्यांमुळे शक्य होत नाही.