द डेटाटेक लॅब्समध्ये अत्याधुनिक AI रिसर्च लॅबचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधन आणि शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, द डेटा टेक लॅब्स (The DataTech Labs) या संस्थेने पुण्यात आपले अत्याधुनिक AI संशोधन आणि नवोपक्रम प्रयोगशाळा (AI Research & Innovation Lab) यांचे उद्घाटन केले.

द डेटाटेक लॅब्स मध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) रिसर्च लॅबचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.  या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कालकर आणि डी.वाय. पाटील विद्यापीठ, आंबीच्या कुलगुरू डॉ. सायली गणकर यांचीही विशेष उपस्थिती होती. 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना, संशोधकांना, शैक्षणिक संस्था आणि शासनाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवकल्पना, कौशल्य विकास, संशोधन आणि धोरण निर्मितीसाठी एकत्र येण्याचे व्यासपीठ पुरवणार आहे. डेटाटेक लॅब्सची ही लॅब केवळ एक सुविधा नाही, तर भारताचे कौशल्यसंपन्न भविष्य घडविणारी एक चळवळ आहे. सातत्यपूर्ण प्रगती, नवकल्पनांची संस्कृती आणि प्रत्यक्ष परिणाम देणारे प्रकल्प हे खरोखरच कौतुकास्पद आहेत. 

डॉ. पराग काळकर म्हणाले, “आजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव व तंत्रज्ञानाची जाणीव असणे आवश्यक आहे. ही लॅब शैक्षणिक व औद्योगिक जगतातील दुवा म्हणून काम करेल आणि नविन करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल.”

डॉ. सायली गणकर म्हणाल्या, “या प्रकारच्या उपक्रमांमुळे भारत एक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनू शकतो. डेटाटेक लॅब्सच्या टीमने आपल्या दृढ निश्चयाने आणि दूरदृष्टीने खरोखरच शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.”

डेटाटेक लॅब्सचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO)  विनीत आंद्रे यांनी सांगितले की,  “ही लॅब म्हणजे बौद्धिक भांडवलात दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आमचा विश्वास आहे की शाश्वत नवकल्पना या वित्तीय शिस्त व दूरदृष्टीपूर्ण धोके स्वीकारण्याच्या संतुलनातून घडतात. आम्ही प्रभावी, स्केलेबल उपाय विकसित करताना भावी प्रतिभेला घडविण्यावर भर देतो.”

डॉ. अमित आंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डेटाटेक लॅब्स ने आतापर्यंतच्या अनेक अडचणींवर मात करत सातत्याने प्रगती साधली आहे. ही लॅब संशोधन, प्रशिक्षण आणि औद्योगिक सहकार्य यासाठी एक प्रमुख केंद्र बनणार असून भारताच्या AI आणि डिजिटल परिवर्तनात मोलाची भूमिका बजावेल.

See also  चतुःश्रृगी पोलिस स्टेशन हद्दीतील अनधिकृत पब, रुफटफ हॉटेल व बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली