पुणे, दि.29 : पासपोर्ट अर्जदारांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि पाषाण येथील पासपोर्ट सेवा केंद्रापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या संदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन पासपोर्ट कार्यालय येथे करण्यात आले होते.
यावेळी डॉ. विनोदकुमार गायकवाड, आयएफएस, प्रादेशिक पारपत्र अधिकारी, पुणे, श्री. ओमप्रकाश दिवटे (अतिरिक्त महापालिका आयुक्त, पीएमसी), श्री. मनोज पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे), श्री. यशवंत हिंगे (मुख्य वाहतूक व्यवस्थापक) तसेच स्थानिक वाहतूक पोलीस आणि पीएमसीचे अधिकारी उपस्थित होते.
या अंतर्गत प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने पुणे महानगरपालिका, पुणे शहर पोलीस, पुणे वाहतूक पोलीस आणि पीएमपीएमएल यांच्याशी समन्वय साधत पाषाण येथील पासपोर्ट सेवा केंद्र परिसरातील पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन, दिव्यांगांसह सर्वांसाठी सुलभ पदपथ (Accessible Footpaths) तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत (Last-mile Connectivity) सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे.
या अनुषंगाने मंगळवारी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणीदरम्यान परिसरातील विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला आणि आवश्यक सुधारणा तातडीने करण्याबाबत चर्चा झाली.
संबंधित यंत्रणांनी पार्किंगची व्यवस्था, वाहतूक कोंडी कमी करणे, सुरक्षित व सुलभ पदपथ उभारणे तसेच पीएमपीएमएलच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा केंद्रापर्यंत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
या संयुक्त बैठकीमुळे पाषाण येथील पासपोर्ट सेवा केंद्रात येणाऱ्या हजारो नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
















