म्हाळुंगेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; नागरिक व नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यात शाब्दिक चकमक

पुणे, दि. ३० : म्हाळुंगे गावातील खड्डेमय रस्ते, रखडलेली विकासकामे आणि नागरी सुविधांच्या समस्यांविरोधात ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुणे महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत संताप व्यक्त करत महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

आंदोलनस्थळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी श्री. आंबेकर आणि श्री. गौतम चाबुकस्वार उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. नागरिक विविध समस्या मांडत असताना चांदेरे यांनी संतप्त होत, “मी बोलायला लागलो तर तुम्ही एकेक जण मागे सरकाल. एकेकाकडे बघून घेईन,” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या वक्तव्यानंतर नागरिक आणि चांदेरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी असा आरोप केला की, महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या पूर्णपणे ऐकून न घेता तेथून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणखी नाराजी पसरली.

यावेळी माजी सरपंच रेखा पाडळे म्हणाल्या, “नगरसेवक नागरिकांनाच दमदाटी करत आहेत. चांदेरे यांची धमकी ही मला किंवा माझ्या मुलालाच नव्हे, तर संपूर्ण गावाला आहे. त्यांनी ‘एकेकाकडे बघून घेईन’ असे म्हटले. आम्हीही त्यांना आव्हान देतो, जे करायचे ते करा. एवढे दिवस रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले, नागरिकांचे अपघात झाले, त्यावेळी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.”

ग्रामस्थांनी सांगितले की, खराब रस्त्यांमुळे परिसरात वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी प्रभावी उपाययोजना न केल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गावातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी काही काळ रस्ता रोको आंदोलनही केले. आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, रखडलेली विकासकामे पूर्ण करणे आणि गावातील मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.

See also  विशाल नगर ते बाणेर जोडणाऱ्या नवीन पुलावर कचऱ्याचे साम्राज्य; आम आदमी पार्टीचे रविराज बबन काळे यांचा प्रशासनाला संतप्त सवाल