वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून ‘वामा बिर्याणी क्वीन’ भव्य बिर्याणी स्पर्धेचे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळवून देतानाच त्यांच्या कलागुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडण्याच्या उद्देशाने वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून, क्लबच्या अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकारातून ‘वामा बिर्याणी क्वीन – Cooking Competition’ या भव्य बिर्याणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माऊली गार्डन, बाणेर येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडली.

महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या पाककलेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि या कौशल्यातून भविष्यात व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने सौ. पूनम विशाल विधाते यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेला पुणे शहरातील विविध भागांतून महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. सहभागी महिलांनी आपल्या पाककलेतील कौशल्य, चविष्ट बिर्याणीच्या विविध प्रकारांची खासियत, पारंपरिक पाककृतींसोबतच आधुनिक पद्धतीने केलेले सादरीकरण अशा विविध माध्यमातून आपल्या कलागुणांचे अप्रतिम दर्शन घडविले.

स्पर्धेत बिर्याणीची चव, दर्जा, मसाल्यांचा योग्य वापर, सादरीकरण, नावीन्य आणि एकूण पाककला कौशल्य अशा विविध निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले.

‘वामा बिर्याणी क्वीन’ स्पर्धेतील विजेत्या

प्रथम पारितोषिक – डॉ. शमा हवा, द्वितीय पारितोषिक – भारती ढगे, तृतीय पारितोषिक – नेहा गायकवाड, चतुर्थ पारितोषिक – संजना मेंगे, पाचवे पारितोषिक – दिव्या मयंक चंचलवाला या सर्व विजेत्या स्पर्धकांचे वामा वुमन्स क्लबच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘वामा बिर्याणी क्वीन’ स्पर्धेला महिलांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत कौतुकास्पद ठरला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिला भगिनीला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांनी सांगितले की, “महिलांच्या हातातील पाककलेचे कौशल्य केवळ घरापुरते मर्यादित न राहता त्याला व्यवसाय आणि रोजगाराची जोड मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिलांना योग्य व्यासपीठ, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास त्या स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर स्वावलंबी होऊ शकतात.”

See also  ‘मिशन समर्थ’ अंतर्गत महानिर्मितीच्या जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन : जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे

त्या पुढे म्हणाल्या की, वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून महिलांच्या कला, कौशल्य, आरोग्य, उद्योजकता आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. ‘वामा बिर्याणी क्वीन’ हा उपक्रमदेखील महिलांच्या कौशल्याला नवी दिशा देणारा ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

स्पर्धेत हार-जीत होत असते; मात्र या स्पर्धेत सहभागी झालेली प्रत्येक महिला ही स्वतःमध्ये एक विजेती आहे. पहिल्याच प्रयत्नात महिलांनी दिलेला भरभरून प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाचे खरे प्रतीक असल्याचेही सौ. पूनम विशाल विधाते यांनी सांगितले.

‘वामा बिर्याणी क्वीन’ ही केवळ बिर्याणीची स्पर्धा नव्हती; तर महिलांच्या कौशल्याला, आत्मविश्वासाला आणि स्वावलंबनाला मिळालेली नवी दिशा होती. महिलांच्या हातातील पाककलेला व्यवसायाची जोड देत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, परीक्षकांचे, आयोजकांचे तसेच उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचे वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांनी मनःपूर्वक आभार मानले.