बाणेरमधील घर पाडल्याच्या प्रकरणी ‘बोंबाबोंब आंदोलन’; आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : बाणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सर्वे नं. ५/१ब येथे संतोष जगदीश लोंढे यांच्या कुटुंबाचे घर फोडून पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेच्या वतीने ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात येणार आहे.

हे आंदोलन सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (गार्डन) येथून सुरू होणार असून आंदोलक पायी चालत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर जाणार आहेत.

या प्रकरणात कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि राहुल वाघवले यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच मांग गारुडी समाजातील संघटनांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पीडित कुटुंबाला साथ द्यावी आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि संबंधित तक्रारीवर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

See also  माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी परिसरात दुचाकी रॅली