चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून, समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज केले.

शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे.  समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तातडीने १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून देश-विदेशातून अनेक नागरिक व उद्योजक येथे येतात. त्यामुळे परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे. चाकणमध्ये येताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा व प्लास्टिक दिसणे ही चिंतेची बाब आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर एमआयडीसीशी चर्चा झाली असून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीचे काम पुढे नेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकल्पाला काही कालावधी लागतो; मात्र कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

See also  महाळुंगे गावात ज्योती नितीन चांदेरे यांची पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, 31 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबतही प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे.चाकण परिसरातील पार्किंगचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. उपलब्ध जागांचा योग्य वापर करून पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमणांवर कठोर कारवाई
चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही. मात्र स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणांना पाठबळ न देता प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करणे आवश्यक आहे. अतिक्रमण निर्मूलनाच्या वेळी स्थानिक पातळीवरून विरोध किंवा अडथळे निर्माण झाल्यास कामाला विलंब होतो. त्यामुळे नागरिक, उद्योजक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

चाकणच्या प्रश्नांवर एमआयडीसी, पीएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगाने काम सुरू केले आहे. विविध बैठकींमध्ये समोर आलेल्या प्रश्नांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही केली जात आहे. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा, अतिक्रमण, गृहनिर्माण सोसायट्या तसेच शाळांशी संबंधित प्रश्ना बाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल. राज्य शासनाच्या अखत्यारितील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. चाकण तसेच संपूर्ण औद्योगिक परिसरातील नागरिक आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून समितीच्या कामकाजा बाबत माहिती
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. पुणे-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या समन्वयातून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचा ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित केल्याचे सांगितले. रस्त्यांवरील खड्डे व साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

See also  नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

वाहतूक नियंत्रणासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान पुढील आठवड्यापासून तैनात करण्यात येणार आहेत. तसेच दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी येत्या शुक्रवारपासून कारवाई सुरू करून महिनाभरात ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एमआयडीसी परिसरातील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक तेथे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यात येणार आहेत. औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्येही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजना देखील त्यांनी सादर केल्या.

कचरा व्यवस्थापनासाठी १९ गावे व एमआयडीसी क्षेत्रासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असून, प्लास्टिक कचऱ्यावरही तातडीने उपाययोजना केली जाणार आहे. वाहनांसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉकवे आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, औद्योगिक पट्ट्यातील वाढता औद्योगिक विस्तार, नागरिकरण आणि वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे.  वाहतूक कोंडी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन व उद्योग विभागाची संयुक्त बैठक घेऊन अल्प, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून आवश्यक ठिकाणी रस्ते रुंदीकरण करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

यावेळी उद्योजक तसेच वाहतूक, उद्योग आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध अडचणी व समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी या अडचणी जाणून घेत संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली तसेच त्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी सबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते.