पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘AWTIS 2026’ तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन १८ ,१९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत ‘आर्यन्स’च्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रकल्प, उत्पादने आणि नवकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानेही होणार आहेत.
या परिषदेला ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक अजय जगताप, संजय शेंडगे, कामेश मोदी, हायड्रोजन विभाग प्रमुख डॉ. विकास शिंदे, सौरऊर्जा विभागप्रमुख भूषण देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत अर्धसंवाहक व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, यंत्रमानव व स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान व उपग्रह, प्रक्षेपण वाहने व विमान-अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, विद्युत दुचाकी व चारचाकी वाहने, हायड्रोजन अर्थव्यवस्था, क्वांटम तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा व डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रणाली, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि ग्राफीन यांसह विविध क्षेत्रांचा समावेश असेल.
विविध तंत्रज्ञान क्षेत्रांतील पूर्ण विकसित उत्पादने प्रत्यक्ष सादर केली जाणार आहेत, हे या परिषदेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच काही निवडक उत्पादने व तंत्रज्ञान तांत्रिक कारणांमुळे प्रोटोटाइप स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. उद्योग प्रतिनिधी, संशोधक, विद्यार्थी, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची, त्याची कार्यपद्धती समजून घेण्याची आणि भविष्यातील उपयोगांविषयी माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
स्टार्टअप पॅव्हिलियन, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे दालन (डीआरडीओ पॅव्हिलियन) तसेच इंडस्ट्री अँड ॲकॅडेमिक पॅव्हिलियन ही या परिषदेची विशेष आकर्षणे ठरणार आहेत. संशोधन व विकास क्षेत्रातील उपक्रमांसोबतच प्रसारमाध्यमांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परिषदेच्या तिन्ही दिवशी विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. जैवऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी; इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स’चे उपसंचालक डॉ. नवल किशोर गुप्ता; नामवंत लेखक, व्यवस्थापनतज्ज्ञ व विचारवंत अच्युत गोडबोले; ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’चे श्री. संदीप रायरीकर हे हायड्रोजन वाहनांसाठी नियामक आराखडा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
















